जवळपास दीड-दोन वर्ष आपण सगळेच घरात होतो. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने सणाचे दिवस आले आहेत. रक्षाबंधन, गणपती, नवरात्र आणि दसऱ्यानंतर दिव्यांचा सण दिवाळी आला आहे. यंदा फक्त दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी नाहीतर दिवाळीला अजूनही बरंच काही करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. कारण आता कोरोनाचं वातावरण बऱ्यापैकी निवळलं आहे. त्यामुळे लोकं घराबाहेर पडू शकतात, अर्थातच सगळी योग्य ती काळजी घेऊनच.
मग यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनचं प्लॅनिंग तुम्ही केलं आहे की नाही. जर केलं नसेल तर तुम्हाला खालील आयडियाज नक्कीच उपयोगी पडतील. ज्यांचा वापर करून तुम्ही घरी किंवा ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी एन्जॉय करू शकाल.
ऑफिससाठी दिवाळी सेलिब्रेशन आयडियाज Diwali Celebration Ideas In Office
आता दिवाळी म्हटल्यावर ऑफिसच्या कलिग्ज्स सोबत सेलिब्रेशन करणं हे आलंच. मग खालील आयडियाज नक्की वाचा.
एकमेंकाना ओळखण्याच चॅलेंज
घरच्या आधीही दिवाळीचं सेलिब्रेशन होतं ते ऑफिसमध्ये. ऑफिसमधल्या दिवाळीची धम्मालच वेगळी असते. मग या चॅलेंजसाठी तुम्हाला लागतील काही प्रश्नांच्या चिठ्ठ्या. ज्या एका बाऊलमध्ये गोळा करून ठेवायच्या आहेत. तुम्ही प्रत्येकाकडून त्यांच्याबद्दलचे प्रश्न चिट्सवर लिहून घ्या. आता सगळ्यांना एका ठिकाणी गोळा करून बसायला सांगा आणि प्रत्येकाला एक चिठ्ठी उचलून त्याचं उत्तर लिहायला सांगा. हा एकमेंकाबद्दल जाणून घेण्याचा सोपा आणि मजेदार खेळ आहे.
बघा तु्म्हाला या खेळात कळेल की, तुम्ही रोज काम करता करता एकमेकांना किती ओळखता ते.
मॉकटेल स्पर्धा
जर तुमच्या ऑफिसचं कँटीन मोठं असेल तर ही स्पर्धा आयोजित करणं फारच सोपं आहे. मॉकटेल स्पर्धेसाठी तुम्हाला दोन-तीन टीम्स बनवाव्या लागतील. एकदा टीम तयार झाल्या की, त्यांना युनिक मॉकटेल आयडियाज शोधून ते बनवायला सांगायच आहे. ज्यांचं मॉकटेल बेस्ट असेल ती टीम जिंकली. या गेमच्या शेवटी तुम्हाला हे युनिक मॉकटेल्सची चव ही घेता येईल. आहे ना मजेदार. मजा आणि मॉकटेल्स अशी दुहेरी मजा यामध्ये आहे.
मिठाई स्पर्धा
आता दिवाळी म्हटल्यावर मिठाई तर हवीच. मग तुमच्या ऑफिसमध्येच बनवलेली मिठाई कशी वाटेल? आहे ना भारी आयडिया. फक्त यासाठी ज्या टीम्स निवडाल त्यांची मिठाई बनवण्याची आणि तुमची ती खाण्याची तयारी हवी. असो तो गंमतीचा भाग आहे. झटपट आणि सोप्या अशा मिठाई बनवण्यासाठी निवडा. मग बघा ही स्पर्धा कशी रंगते. तसंच यात भाग घेण्यासाठी पुरूषांनाही प्रोत्साहीत करा. या स्पर्धेनंतर एकत्रितपणे मिठाईचा आस्वाद घ्या.
ऑफिसच्या व्हर्च्युअल दिवाळी सेलिब्रेशनसाठी आयडियाज Virtual Diwali Celebration Ideas For Office
जर तुमचं ऑफिस अजूनही सुरू झालं नसेल आणि व्हर्च्युअल दिवाळी सेलिब्रेशनचा प्लॅन असेल तर खालील आयडियाज तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. कारण का अजूनही बऱ्याच ऑफिसेसतर्फे वर्क फ्रॉम होमच सुरू आहे.
ऑनलाईन संगीत कॉन्सर्ट
ऑफिसमध्ये छान आवाज असणाऱ्या आणि गाण्याची आवड असणाऱ्या व्यक्ती असतातच. तसंच अनेक संगीत वादनाचीही आवड असते. दिवाळीच्या व्हर्चुअल सेलिब्रेशनच्या निमित्ताने तुम्ही खास ऑनलाईन संगीत कॉन्सर्टही आयोजित करू शकता. ज्यामुळे तुमची दिवाळीची एक संध्याकाळ छान सुरेल आणि अविस्मरणीय होईल.
डान्स पार्टी
आता ऑफिस पार्टी म्हटल्यावर डान्स तर हवाच ना. व्हर्च्युअल पार्टी असली म्हणून काय झालं. छानपैकी प्लेलिस्ट बनवा आणि आपल्या सहकाऱ्यांसोबत मस्त डान्स करा. घरून का असेना दिवाळी म्हटल्यावर धमाल मस्ती झालीच पाहिजे.
फॅशन शो
दिवाळी म्हटल्यावर पारंपारिक वेश केला जातोच. मग छान सजून बसलेल्या सहकाऱ्यांकडून थोडं कॅटवॉक करून घ्यायला काय हरकत आहे. छान पारंपारिक वेशातला फॅशन शो आयोजित करा आणि ज्यांची वेशभूषा छान असेल त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहीतही करा.
घरच्या दिवाळी सेलिब्रेशनसाठी सोप्या आयडियाज Diwali Celebration Ideas At Home
घरचं दिवाळी सेलिब्रेशन तर छान झालंच पाहिजे. मग घरच्यांसोबत धमाल मस्ती आणि सुंदर दिवाळीसाठी खालील आयडियाज नक्की वापरा.
पाहुण्याचं स्वागत
तुमच्या घरी जर जवळची मित्रमंडळी किंवा नातेवाईक येणार असतील तर त्यांना खास वाटलं पाहिजेच. मग त्यांच्या स्वागतासाठी खास फुलांचे हार बनवा. जसं आपण घराच्या दाराला झेंडूच्या फुलांनी सजवतो तसंच घरी येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागतही खास झेंडूच्या हारांनी होऊ दे.
शुभ शकुनाची रांगोळी
रांगोळी ही शुभ शकुन आणि भाग्यदायी मानली जाते. जी आपल्याकडे प्रत्येक चांगल्या प्रसंगी आवर्जून काढली जाते. मग यंदाही छान ऑर्गेनिक रंगांचा वापर किंवा फुलांचा वापर करून रांगोळी काढा. आपल्यांसोबत मुलांनाही रांगोळी काढायला शिकवा. ज्यामुळे त्यांनाही रांगोळीची कला आणि महत्त्व कळेल.
दिव्यांची दिवाळी
दरवर्षी जर तुम्ही बाहेरून रंगीबेरंगी पणत्या आणत असाल तर यंदा घरच्याघरी पणत्या रंगवा. छान रंग, चमकी आणि रिबीन्सचा वापर करून साध्या पणत्यांना नवा लुक द्या. कारण दिवाळी आणि पणत्या यांचं समीकरणच आहे. दिव्यांचा सण म्हणजेच आपली दिवाळी खऱ्या अर्थाने कुटुंबासोबत आनंदाने साजरी करा.
दिवाळी आणि पत्त्यांची रंगत
महाराष्ट्रात नाही पण भारताच्या इतर भागात दिवाळीच्या निमित्ताने पत्ते आवर्जून खेळले जातात. खासकरून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पत्त्यांचे डाव रंगतात. तुम्ही बॉलीवूड सेलेब्सच्या दिवाळी पार्टीजमध्ये याबद्दल वाचलं असेलच. मग यंदा तुमच्या दिवाळी गेट टू गेदरमध्येही रंगू दे पत्त्यांचा डाव.
आम्हाला आशा आहे की, वरील आयडियाज तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. तुमची यंदाची दिवाळी सुरक्षित आणि आनंददायी असो हीच आमची शुभेच्छा. शुभ दिपावली.