शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांच्या बद्दल थोडक्यात माहिती | Shivshankar Bhau Patil Shegaon

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील (Shivshankar Bhau Patil) यांचे ४ ऑगस्ट २०२१ रोजी दुखद निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. आज आपण त्यांच्या स्वतःबद्दल व त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी आणि संपूर्ण जीवनाची थोडक्यात माहिती घेऊयात.

Shivshankar Bhau Patil Shegaon Information In Marathi

व्यवस्थापन शास्त्र केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात अमलात असे आणावे याचे मूर्तीमंत उदाहरण

शेगावचे नाव कानावर पडले की प्रत्येक मराठी माणसाच्या मनात श्रद्धा भाव उत्पन्न होतो . मनातल्या मनात प्रत्येक जण हात जोडुन श्री गजानन महाराजांची मुर्ती मनःचक्षुंसमोर आणून नतमस्तक होतो ..!!

श्री गजानन महाराज या नावाने ओळखला जाणारा एक फ़कीर, विदर्भातल्या माणसाच्या हृदयात कायम घर करून असतो. श्री गजानन महाराजांचा फ़ोटो देवघरात नाही, असं एक घर सापडणार नाही ..!!पण आज आपण श्री गजानन महाराजांबद्दल नाही तर एका वेगळ्याच एकविसाव्या शतकातील संताविषयी बोलणार आहोत ..!!

या संताचे नाव शिवशंकर .. वडील श्री गजानन महाराजांच्या मंदिरातले सेवेकरी .. वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन, शिवशंकर वयाच्या ९ व्या वर्षीच संस्थानाच्या सेवेत रुजु झाला. संस्थानात फ़रशी बसविण्याचं काम सुरु होतं. शिवशंकर या कामात गढुन गेला. ही सुरुवात होती एका प्रदीर्घ सेवायज्ञाची, जो आजतागायत सुरुच आहे ..!! गेली आठ दशकं सुरु आहे ..!!

शिवशंकर भाऊ पाटील यांचे शिक्षण

शिवशंकरने फ़ॉर्मल शिक्षण असं कांहीच घेतलं नाही. तो जे काही शिकला ते संस्थानात सेवा देता देता ..!! श्रद्धा व सेवाभाव याच्या जोरावर माणुस किती प्रगती साधु शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजचा ‘शेगावीचा राणा’ म्हणुन उल्लेख केला ते शिवशंकर भाऊ पाटील ..!!

भारतात राहु द्या पण महाराष्ट्रात देखील अनेकांना या व्यक्ती बद्दल फारशी माहिती नाही. पण त्यांच्या कार्याची दखल थेट अमेरिकेतल्या हॉवर्ड विद्यापीठाने घेतली आहे. व्यवस्थापनाचा एक आगळा नमुना म्हणुन, ‘व्यवस्थापन’ हा विषय शिकविणार्‍या हॉवर्ड विद्यापीठात चक्क शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो .. आणि या व्यवस्थापनाचं श्रेय जातं एका अ-शिक्षीत माणसाकडे, श्री. शिवशंकर भाउ पाटीलांकडे ..!!

शिवशंकर भाऊ पाटील यांचे पुढारपण

संस्थानात ‘सेवाव्रती’ असलेले शिवशंकरजी, ट्रस्टचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांनी शेगावचा कायापालट घडवुन आणला ..!! ज्यावेळी शिवशंकर भाऊनी संस्थेच्या कामाची सूत्रं घेतली तेव्हा संस्थेची उलाढाल अवघी ४५ लाख रुपयांची होती ..!! आज शेगाव संस्थानाची वार्षिक उलाढाल 200 कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे ..!!

शिवशंकर भाऊंकडे ना शिक्षण ना कौटुंबीक वारसा ..!! त्यांचं बलस्थान म्हणजे मनातला सेवाभाव व समर्पणाची वृत्ती ..!! आणि या बलस्थानांच्या जोरावरच त्यांनी अशक्य वाटणारं शक्य करुन दाखवलं आहे ..!!

शेगावच्या मंदिराचं व्यवस्थापन बघीतलं की आपण ही तोंडात बोट घालतो आणि त्या चोख व्यवस्थेसमोर नतमस्तक होतो. आपल्याला येथे पावला पावलावर भेटतात ते सेवेकरी ..!!

सुमारे २० हजार सेवेकरी एका वेळेस येथे सेवा देत असतात. शिवशंकर भाऊ आपल्यातला सेवा भाव इतक्या प्रभावीपणे या सेवाव्रतींना प्रदान करतात की कुठलाही मोबदला न घेता हे सेवेकरी संस्थानात पडेल ते काम करत असतात. सगळे कष्ट उचलत असतात व आलेला भाविक श्रद्धेने नतमस्तक होवुन समाधानाने व निश्चिंत होवुनच परत जाईल, यासाठी कार्यरत असतात ..!!

शेगाव देवस्थानची स्वछता

शेगाव देवस्थान प्रसिद्ध आहे ते सोन्या चांदीने मढवलेल्या मुर्तींनी नव्हे, तर इथल्या स्वच्छतेमुळे ..!! संस्थानाच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक ठिकाणची स्वच्छता ही सगळ्यांच्या नजरेत भरते ..!!

श्री गजानन मंदिर असो वा भक्तनिवास, आनंदसागर सारखा ६५० एकर इतक्या प्रचंड जागेत वसलेला प्रकल्प असो वा महाराष्ट्रातील सर्वोत्तम असणारं अभियांत्रिकी कॉलेज .. ह्या सगळ्याच ठिकाणी कागदाचा एकही कपटा आणि झाडावरून गळलेलं पान मिळणं मुश्कील, इतकी कमालीची स्वच्छता राखली जाते ..!!

आपलं कार्य फक्त तितकंच मर्यादित न ठेवता ४२ पेक्षा जास्त उपक्रम संस्थेच्या वतीने राबवले गेले आहेत ..!! आजबाजूच्या १००० गावांपेक्षा जास्त गावांमध्ये वैद्यकीय सेवा पुरवण्याची जबाबदारी संस्थेने उचलली आहे ..!!

इथे प्रत्येक गोष्टीचं आधुनिकीकरण अगदी २१ व्या शतकाप्रमाणे केलं गेलं आहे ..!! मग ते अगदी सामान नेणाच्या ट्राँली पासून असो किंवा आग, नैसर्गिक आपत्तीच्या सुमारास आपत्कालीन दिशादर्शक रस्ते बांधणीने असो ..!! दर्शनाच्या रांगेत उभं असताना पायाला चटका लागू नये म्हणून दिलेला स्पेशल रंगाचा लेप असो वा रांगेत प्रत्येक ठिकाणी बसण्याची व्यवस्था ते मातृरूम पासून २४ तास सेवेत असणारी वैद्यकीय मदत असो ..!!

शिवशंकर पाटील यांची कार्य प्रणाली

संस्थानचे आर्थिक आणि इतर व्यवहार, ‘सॅप’ प्रणालीशी अगदी २००६ पासून जोडलेले आहेत ..!! ‘श्रीगजानन महाराज संस्थान’ ही अशी Software प्रणाली वापरणारी जगातील पहिली NGO ..!!

संस्थानचे व्यवहार चोख आणि पारदर्शक असावेत म्हणून, मुख्य विश्वस्त शिवशंकर पाटील यांनी ती प्रणाली बसवून घेतली ..!! मंदिराच्या अकौंट्स विभागात साधा पांढरा शर्ट, लेंगा व टोपी घातलेले अनेक कर्मचारी SAP प्रणालीवर काम करताना दिसतात ..!! संस्थानचे Web Server, SAP Servers आहेत ..!!कॉलेज व्यवस्थापन स्वत: त्यांची निगा बाराही महिने आणि चोवीस तास राखते ..!!

संस्थानचा पैसा म्हणजे ‘भक्तांचा पैसा’ ही धारणा असल्याने, प्रत्येक बाबतीत स्व-निर्भर राहण्याचा प्रयत्न दिसून येतो ..!! Software दुरुस्ती आणि वार्षिक देखभालीचा अवाढव्य खर्च संस्थेबाहेर देण्यापेक्षा, शिक्षकांनी स्वत: देखभाल केली तर संस्थेच्या पैशाची मोठी बचत होते आणि शिक्षकांचे ज्ञानदेखील अद्ययावत राहते याची जाणीव अगदी प्रत्येकास आहे ..!!

स्वत:चे भव्य Incubation Center, उत्तम उद्योजक निर्माण करण्यासाठी काढले आहे .. सेंटर देखणे आणि अत्याधुनिक सुविधायुक्त आहे. तेथे नवउद्योजकास जागेपासून संशोधनाच्या सर्व सोयी दिल्या जातात ..!! त्यासाठीचा सर्व खर्च संस्था स्वत:च्या अंगावर घेते ..!! संशोधन पूर्ण झाले तर उद्योजकास मार्केटिंगसाठी मदत देखील करते. तो लवकरात लवकर स्व-निर्भर होईल असे बघते ..!!

शेगाव चे भव्य अन्नदान

शेगाव संस्थानचे स्वत:चे अत्याधुनिक किचन बघण्यासारखे आहे. दर ताशी चाळीस हजार पोळ्या करणारे मशीन तेथे आहे. ते मशीन जर बंद पडले तर ताशी दहा हजार पोळ्या बनवणारी दोन मशिन्स पर्यायी व्वस्था म्हणून आहेत. एका बाजूने कणिक घातली, की दुसर्‍या बाजूने भाजलेली पोळी बाहेर पडते ..!! एका वेळी शंभर किलोंचा भात, पंच्याहत्तर किलो भाजी, पन्नास किलो डाळ, शंभर डिशेस शिरा-पोहे-उपमा इत्यादी सर्व करणारी अवाढव्य मशीन्स अव्याहत भक्तांना अन्न पुरवत असतात ..!! सर्व मशिनरी स्टेनलेस स्टीलमध्ये बनवली गेलेली आहे. तेथे कमालीची स्वच्छता आहे. अन्नगृहाला अव्याहत शुद्ध पाणी मिळण्यासाठी प्रचंड मोठे RO Plants उभारले आहेत ..!! तेथे बनवलेले पदार्थ संस्थानच्या स्पेशल गाड्यांतून गावातील वेगवेगळ्या भोजनगृहात, भक्त निवासात, कँटिन इत्यादीमध्ये तत्परतेने पोचवले जातात .. त्या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचा अंदाज घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणावरून डिमांड स्वयंपाकघरास मोबाईलवरून कळवली जाते ..!! आणि त्या अंदाजाने अन्न बनवून पुरवले जाते .. त्या कामाची अवाढव्यता शब्दांत वर्णन करण्यासारखी नाही ..!! पण ती द्रौपदीची थाळी अव्याहत अन्नदान करत असते. तेथील व्यवस्थापन भल्याभल्यांना (म्हणजे व्यवस्थापन तज्ज्ञांना ..!!) तोंडात बोट घालायला लावणारे आहे. कोठेही गोंधळ नाही, अन्नाची नासाडी नाही, कोणीही उपाशी राहणार नाही ..!!

शिवशंकर भाऊ पाटील यांनी साकारले सुंदर आणि luxurious भक्त निवास

संस्थानचे अनेक भक्त निवास आहेत. तेथे शेकडो खोल्या अगदी AC सारख्या सुविधांसकट आहेत. सवलतीच्या किंमतीत तेथे राहण्याची सुविधा मिळते. सुविधा इतकी, की कोठेही तक्रार करण्यास वाव नाही. येणाऱ्या भक्तास खात्रीने समाधान मिळते. भक्तांची फसवणूक कोठेही होणार नाही याची काळजी घेतली जाते. शेगाव हे खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्र आहे ..!!

आणि हे सर्व शक्य झाले आहे ते शिवशंकर भाऊ पाटील या ‘कर्मयोगी’मुळे ..!! आजही भाऊ १२ तासांपेक्षा जास्त काम करतात. कोणतीही प्रसिद्धीची हाव नाही ..!! ना मोठेपणा मिरवण्याची हाव, ना सत्तेची लालसा, ना पैशाचा मोह ..!! शिवशंकरभाऊ पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये पाणी आणि चहाचा थर्मास देखील घरून घेऊन येतात ..!!

आधुनिक शेगावच्या या निर्मात्याचा किती हा निर्मोहीपणा ..!! ‘गण गण गण गणात बोते’ या महाराजांच्या उक्ती प्रमाणे, गणांचा (भक्तांचा) पैसा गणात बोणाऱ्या (रुजवणाऱ्या) महाराजांच्या ह्या भक्तास त्रिवार नमस्कार ..!!

!! गण गण गणात बोते !!
जय गजानन

Leave a Comment

close